Thursday, 5 June 2014

परमरहस्य : प्रस्तावना..............-डॉ. शे. दे. पसारकर


परमरहस्य : प्रस्तावना


ऐकोनि जीवीं धरावा' असा ग्रंथ :
श्रीक्षेत्र कपिलधार येथे समाधिस्थ झालेले संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामी आणि शिखरशिंगणापूर येथील श्रीशांतलिंगस्वामी हे महाराष्ट्रीय वीरशैव संतकवींचे अध्वर्यू होत. दोघांचीही मराठी रचना उपलब्ध झाली आहे. समकालीन असलेल्या ह्या दोन्ही संतकवींनी मराठी वीरशैवांना आपल्या रचना-कर्तृत्वाने मानसिक आधार दिला, त्यांची सांप्रदायिक अस्मिता जागृत केली. आपल्या ओजस्वी, संजीवक वाणीने स्वधर्मपालनाचा उद्घोष करून परधर्मीय व परपंथीय आक्रमणामुळे दडपलेल्या वीरशैव समाजात चैतन्य निर्माण केले. वीरशैव स्त्री-पुरुषांना मानसिक बळ देऊन आपल्या संप्रदाय-वैशिष्ट्यांचे जतन करणे हा वीरशैव संतकवींचा जीवनधर्मच होता. त्यासाठी त्यांनी कीर्तने केली, भजनी परंपरा निर्माण केली. अभंग, पदे, आरत्या रचून लोकमनाशी नाते जोडले आणि ओवीबद्ध भाष्यग्रंथ रचून वीरशैवांना आपल्या धर्मविचाराची ओळख करून दिली. वीरशैव मराठी ग्रंथांत, वीरशैव तत्त्वज्ञान- विशेषत: वीरशैवांचा आचारधर्म ज्यामध्ये प्रासादिक रीतीने प्रकट झाला आहे असा, महाराष्ट्रातील लोकप्रिय ग्रंथ म्हणजे श्रीमन्मथस्वामींचा परमरहस्य' हा भाष्यग्रंथ होय.

इ. स. १८८७ मध्ये बार्शी येथे परमरहस्या'वर प्रथम मुद्रणसंस्कार झाला. परंतु त्यापूर्वी परमरहस्या'ची हस्तलिखिते मठामंदिरांत लिहिली जात होत होती, संग्रहित केली जात होती, वाचली-ऐकली आणि अभ्यासली जात होती. मुद्रित झाल्यामुळे हा ग्रंथ लोकांसमोर अधिक प्रमाणात आला, त्याचा प्रसार-प्रचार अधिक झाला एवढे मात्र खरे. १९७४ मध्ये ष. ब्र. श्री शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर यांनी सर्वाधिक ओवीसंख्या असलेलीपरमरहस्या'ची प्रत प्रकाशित केली. त्यांच्या प्रतीला सांप्रदायिक प्रत' असे म्हणता येईल. या सांप्रदायिक प्रतीचेच पुनर्मुद्रण वारंवार होत राहिले आहे. दरम्यान इ. स. २००१ मध्ये, शैवभारती शोधप्रतिष्ठान, वाराणसी या संस्थेतर्फे हस्तलिखितानुसार यथामूल संपादिलेली परमरहस्या'ची संशोधित प्रतही श्रीमन्मथशिवलिंगकृत परमरहस्य' (संपादक ; शे. दे. पसारकर) या नावाने प्रकाशित झाली आहे.

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण असे की, मन्मथस्वामींचा परमरहस्य' हा ग्रंथ मठाधिपतींच्या, भाविकांच्या आणि अभ्यासकांच्या श्रद्धेचा व जिज्ञासेचा विषय होऊन राहिलेला आहे, हे लक्षात यावे. जीवनभर धर्मजागर करणा-या मन्मथस्वामींची ही वाङ्मयी मूर्ती पंथप्रचारकांना आणि साहित्याभ्यासकांना खुणावत राहिली नसती तरच नवल! हा सांप्रदायिक ग्रंथ प्रकाशित करून त्याचा अधिकाधिक प्रसार-प्रचार करणा-या प्रयत्नाचे सर्वांनी सानंद स्वागत केले पाहिजे.

स्वतंत्र निर्मिती
-----------------
शिवगौरीसंवादात्मक असा मन्मथस्वामींचा हा ग्रंथ संस्कृत परमरहस्य' या ग्रंथावरील ओवीबद्ध भाष्य असून यात शक्तिविशिष्ट-अद्वैत, षट्स्थल आणि अष्टावरण ह्या वीरशैव-सिद्धान्तांचे सुगम विवरण केलेले आहे. हा भाष्यग्रंथ असला तरी मन्मथस्वामींची स्वतंत्र निर्मितीही आहे. मन्मथस्वामी व श्रोते यांचा संवाद, भगवान शिवांनी पार्वतीची वाहिलेली शपथ व त्यांनी पार्वतीविषयी व्यक्त केलेली प्रीतिभावना, वीरशैव पुरुष-जंगम-भक्त यांची रेखाटलेली शब्दचित्रे, अंत:काळाचे वर्णन, दांभिक गुरूंची चित्रे हे सारे वाचल्यावर मन्मथस्वामींनी मूळ ग्रंथात आपल्या प्रतिभेने किती गहिरे रंग भरले आहेत याची कल्पना येते. मूळ संस्कृत ग्रंथात शंकर आणि पार्वती शिव उवाच' देव्युवाच' या दोन शब्दांतच गोठलेले दिसतात. परंतु मन्मथस्वामींच्या ग्रंथात मात्र शंकर-पार्वती यांना भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वे प्राप्त झालेली आहेत. शंकर जणू आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा अनुभव येथे येतो. वीरशैव पुरुषाचे वर्णन करताना शंकर आपले ईश्वरत्व विसरून म्हणतात:-
तो प्राणसखा आम्हां बहु । त्याचे चरण हृदयीं ध्याऊं ।
तयावांचूनि न पाहूं । परवस्तु आणिक ।। ३.९३
भक्ताच्या चरणाचे ध्यान करणारे हे शंकर, ही मन्मथस्वामींची स्वतंत्र निर्मिती आहे. भक्तामुळे माझे जीवन अर्थपूर्ण झाले आहे, भक्तामुळेच माझ्या अंगावर वस्त्रालंकार आहेत, त्यांच्याच आज्ञेत मी सदैव राहतो, असे शंकर सांगतात:-
मज भक्तांचेनि येथें असणें । भक्तांचेनि योगें माझें जिणें ।
मी भक्तांचेनि महिमानें । श्लाघ्यतु असे ।। ८.९७
भक्तांचेनि मज भूषणें । भक्तांचेनि मज लेणें नेसणें ।
भक्तांचेनि आज्ञावचनें । मी वर्तत असे वो देवी ।। ८.९८
अशाप्रकारे देवपण बाजूला ठेवून परमरहस्या'त शंकर भावनाप्रधान होऊन बोलतात, तेव्हा मन्मथस्वामींनी कैलासात वास्तव्य करणा-या भगवान शंकरांना भोळ्या भाविकांच्या शेजारी आणून उभे केले आहे, असे वाटत राहते. भक्तमाहात्म्यवर्णनात रंगलेले शंकर पुढे सांगतात, 'भक्तरूपी वृक्षाच्या सावलीतच मला विश्रांती मिळते, मी सदैव तेथेच राहतो. म्हणून तर बसवेश्वरासारख्या भक्ताच्या पाळण्यात मी तान्हे बाळ होऊन राहतो. गंगाजळासारखे निष्कपट हृदय असलेल्या, शिवकथा-शिवगोष्टी सांगताना अंत:करण उचंबळून येणा-या भक्ताच्या हृदयातच माझे वास्तव्य असते. त्याचा मी अंकित असतो. तो चालत असतो तेव्हा त्याच्या वाटेवरचे खडे मी वेचतो, त्याच्या अवतीभोवती राहून त्याच्यावर येणा-या विघ्नांचे निवारण करतो. इतकेच काय, तो ज्याला तुझे बरे होईल' असा आशीर्वाद देतो त्याचे मला कल्याण करावेच लागते':-
जयास तो वचन देईल । म्हणें जाय तुझें बरें होईल ।
तया मज देणें लागेल । तो म्हणेल तेंचि तें ।। १५.१६०
भक्ताविषयी अशी प्रगाढ प्रीती व्यक्त करणारे शंकर मूळ ग्रंथात नसून, ही मन्मथस्वामींची स्वतंत्र निर्मिती आहे. पार्वतीविषयीही अशीच प्रेमबहळ भाषा शंकराच्या तोंडी मन्मथस्वामींनी योजिली आहे.
पार्वती ही ज्ञानलालसा श्रोता. हळुवारपणे प्रश्न विचारून शंकरांच्या मनातील गुह्य काढून घेण्यात चतुर. सतत प्रश्न विचारून ती शंकराला बोलत ठेवते. तिच्या प्रेमापोटी शंकर बोलत राहतात, वीरशैव-विचारांचे विवरण करीत राहतात. तिचा प्रश्न ऐकून तुवां प्रश्न केला सुखदायक । माझे उल्हासलें निजसुख' (७.६) असा आपला आनंद व्यक्त करतात. कुंडातील अग्नीत तुपाची धार पडल्यावर अग्नी देदीप्यमान होतो त्याप्रमाणे पार्वतीच्या प्रश्नामुळे माझे वस्तुज्ञान झळाळून उठते, असे तिचे कौतुक करतात. कधी तिला भक्तीसीं रत्न' असे गौरवपर विशेषण देतात, कधी भक्तराज' असा किताब बहाल करतात, तर कधी तूं माझा भक्त म्हणोनि परम । निरोपिलें वो देवी' (५.१३४) असा तिच्या अधिकाराचा गौरव करतात. एके ठिकाणी तर आपले बोलणे असत्य ठरले तर पार्वतीची शपथ वाहण्याइतके शंकर भावविवश होतात (१५.८७). पार्वतीविषयी भगवान शंकरांना वाटणारा जिव्हाळाच मन्मथस्वामींनी येथे व्यक्त केलेला आहे.
भगवान शंकरांनी गुह्यतम असे परमरहस्य' सांगितल्यामुळे पार्वती आनंदविभोर झाली. तन्मय होऊन तटस्थ झाली. परमरहस्या'च्या श्रवणामुळे आलेली धन्यता तिने शब्दांतून प्रकट केली आहे:-
म्हणे अजि भाग्य उदया आलें । जें बहुकाळ होतें लोपलें ।
तें स्वामीनें बोधिलें । कृपा करोनि मज ।। १३.४४
आजि माझ्या दैवां नाहीं पार । जें स्वमुखें निरोपितसा दातार ।
आतां कायसा दरार । जन्ममृत्यूचा ।। १३.४५
सतराव्या अध्यायात आनंदविभोर झालेली पार्वती भानावर येऊन भगवान शंकरांना साष्टांग नमस्कार करते. महापुरात वाहून जाणा-या मनुष्याचा जीव वाचवावा तसे मला शंकरांनी परमरहस्य' बोधून वाचविले, अशी कृतार्थ भावना व्यक्त करते. शंकर-पार्वती यांना अशी भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वे बहाल करणारी मन्मथस्वामींची प्रतिभा सादर वंदन करावी अशीच आहे.

ग्रंथकार मन्मथस्वामी आणि श्रवणोत्सुक श्रोते यांचा संवाददेखील मन्मथस्वामींच्या स्वतंत्र निर्मितिशैलीची साक्ष देतो. श्रोते म्हणजे प्रत्यक्ष शिवगणच. त्यांना सावध होवोनि निरूपणीं आतां । ऐका टीका परमरहस्याची' (१.२५) अशी विनंती ते करतात आणि लगेच आपला तोल गेला म्हणून ओशाळतात. शिवगण कधी असावध असू शकतात? परंतु आपण तसे बोलून चुकलो. आपल्या अज्ञानामुळे त्यांच्यावर हा अन्याय झाला अशी जाणीव त्यांना होते. हा आपला पिसेपणाच झाला असे वाटून, मग ते संकोचून श्रोत्यांची क्षमा मागतात:-
तरी अन्याय क्षमा कीजें । पितयासारिखे साहूनि जाईजें ।
मज अपत्यातें कृपादृष्टीनें पाहिजें । शिवगणीं तुम्ही ।। १.२८
आणि यानंतर श्रोतेरूपी शिवगण रुसले असतील अशा भावनेने मन्मथस्वामी परोपरीने त्यांची समजूत काढतात. मन्मथस्वामींचा हा परिहार जरा जादाच होतो आहे असे वाटून की काय, श्रोते आतां परिहार देसीं किती । शिव काय बोलिलें पार्वतीप्रति । तें निरोपी आतां'' (१.३४) असे सांगून त्यांना मूळपदावर आणतात.
मूळ संस्कृत परमरहस्या'त नसलेला असा हा ग्रंथकार-श्रोतृसंवाद मन्मथस्वामींच्या स्वतंत्र निर्मितीचा द्योतक आहे.

वीरशैवांचा आचरण-कोश
----------------------------
मन्मथस्वामींच्या स्वतंत्र निर्मितीची, कवित्वाची पुष्कळ चर्चा करता येईल. परंतु परमरहस्या'ची मुख्य निर्मितिप्रेरणा, जनसामान्यांना वीरशैव तत्त्वविचार व आचार सुगम करून सांगणे, ही आहे. परि जडजीव तरती तुमचिया प्रसादें' (१.३३) असे मन्मथस्वामींनी शिवगणस्वरूप श्रोत्यांना उद्देशून म्हटले ते याच अर्थाने. ज्ञान हे बुद्धिगम्य असून डोळस असते, परंतु निष्क्रिय असते. ते सक्रिय होते ते आचरणामुळे. आचारशून्य ज्ञान मनुष्याला लिंगांगसामरस्याची- मोक्षाची- प्राप्ती करून देऊ शकत नाही, हा विचार मन्मथस्वामींनी अंध-पंगु-दृष्टान्त देऊन स्पष्ट केला आहे. पांगळा डोळस असतो, पण चालू शकत नाही. आंधळा चालू शकतो, पण त्याला दिसत नाही. दोघे एकत्र आले तर पांगळा दिशा दाखवू शकतो आणि त्या दिशेने आंधळा पांगळ्याला घेऊन जाऊ शकतो. त्याप्रमाणे डोळस ज्ञान आणि सक्रिय आचार यांचा समन्वय ज्याच्या जीवनात होतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते, असे मन्मथस्वामींनी स्पष्ट केले आहे. ज्ञान सक्रिय असावे आणि आचरण डोळस असावे, असे त्यांना सूचित करायचे आहे. वीरशैवांनी धर्माचरण करताना ते अंधपणे करू नये, तर डोळसपणे करावे, असा मन्मथस्वामींचा आग्रह आहे. सांप्रदायिक संकल्पना समजून न घेता, केवळ इतरांचे पाहून केलेले आचरण निष्फळ ठरते, असे त्यांचे प्रतिपादन आहे (१४.१०८).
आचरण डोळसपणे कसे करावे हे स्पष्ट करण्यासाठीच मन्मथस्वामींनी परमरहस्या'ची रचना केली आहे. म्हणूनच परमरहस्य' हा वीरशैवांचा आचरण-कोश ठरला आहे. ज्योत पेटवायची असेल तर तेल आणि वात एकत्र हवी, नाद उमटवायचा असेल तर वाद्य आणि हात एकत्र आले पाहिजेत, बीज अंकुरायचे असेल तर भूमी आणि मेघ यांचा संबंध घडायला हवा; त्याप्रमाणे मोक्ष मिळवायचा असेल तर ज्ञान आणि क्रिया यांच्यात समन्वय हवा, असे मन्मथस्वामींचे प्रतिपादन आहे:-
तेलवातीविण कैसें प्रकाशे ज्योति । वाद्यें वाजविल्याविण नाद काय उमटती ।
मेघभूमीविण निपजती । धान्यबीज काई ।। ८.५१
यालागीं क्रियाज्ञानाविण । न प्रकाशें चैतन्यघन ।
म्हणोनि न विसंबती सज्ञान । उभयांसीं जाण पां ।। ८.५२
एवढे सांगून मन्मथस्वामी थांबत नाहीत, तर ज्यांनी आपल्या जीवनात ज्ञान आणि क्रिया यांचा समन्वय केलेला आहे, असा वीरशैव पुरुष आदर्श म्हणून ते श्रोत्यांसमोर उभा करतात. या दृष्टीने वीरशैव (३.२१-४५), भक्त (८.८९-११७), प्राणलिंगी/जंगम (१५.१०१-१७१) यांची लक्षणे जिज्ञासू वाचकांनी अवश्य पाहावीत.
गुरू, लिंग, जंगम ही वीरशैवांची तीन आराध्ये एकरूप असून त्यांचा तीर्थ-प्रसाद वीरशैवाने श्रद्धापूर्वक नित्य सेवन केला पाहिजे असा धर्मदंडक आहे. पादतीर्थाचे महत्त्व, पादतीर्थ कोणाचे घ्यावे, कोणत्या रीतीने घ्यावे याचे सविस्तर विवरण मन्मथस्वामींनी दुस-या अध्यायात केले आहे. पादतीर्थसेवनात राजा असो वा रंक, कोणालाच सवलत नाही. आचारमार्गाचे ठायी । राव रंक सारखाचि पाही' (२.४४) असे त्यांनी बजावून सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर वीरशैवांच्या पंचपीठांपैकी एका पीठाकडून दीक्षा घेतलेल्या भक्ताने अन्य पीठांच्या आचार्यांविषयी व शिवाचार्यांविषयी भेदभाव न बाळगता, त्यांचेही तीर्थ घेतले पाहिजे, असे ते स्पष्ट सांगतात:-
ही परसूत्राची मूर्त । याचें कैसें सेवावें तीर्थ ।
म्हणे तो नोव्हे शिवभक्त । लिंगधारी वा जंगम ।। २.३३
जंगम देखूनि भावें वंदावें । माझें तुझें बगीचें न म्हणावें ।। ९.१०
जंगमलांछन देखोनि नयनीं । आपुली परावी बगी न धरी मनीं ।। १२.३४
बगी म्हणजे सूत्र. पर्यायाने पीठ, सिंहासन. रंभापुरी पीठ (वीरसिंहासन), उज्जयिनी पीठ (सद्धर्मसिंहासन), केदार पीठ (वैराग्यसिंहासन), श्रीशैल पीठ (सूर्यसिंहासन) आणि काशी पीठ (ज्ञानसिंहासन) अशी वीरशैवांची पंचपीठे असून प्रत्येक पीठाचे सूत्र-गोत्र भिन्न असते. यांपैकी एखाद्या पीठाच्या शाखामठावरील शिवाचार्याकडून वीरशैवाने लिंगदीक्षा घेतलेली असते. म्हणजे प्रत्येक वीरशैव कोणत्या तरी पीठाचा दीक्षित असतो. असे असले तरी केवळ आपल्या पीठाच्याच नव्हे, तर अन्य पीठांच्या आचार्यांचा, शिवाचार्यांचा आणि शिवयोगी जंगमांचा त्याने परकेपणा न बाळगता आदर-सत्कार केला पाहिजे, असा वरील ओव्यांचा आशय आहे.
गुरू, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, विभूती, रुद्राक्ष व मंत्र ही वीरशैवांची अष्टावरणे असून पादोदक (तीर्थ) या आवरणाचा मन्मथस्वामींनी सविस्तर ऊहापोह केला आहे. अन्य आवरणांचेही यथोचित स्पष्टीकरण त्यांनी केलेले आढळते. लिंगधारण, गुरु-जंगमाविषयीची श्रद्धा, त्यांच्या तीर्थ-प्रसादाचे सेवन, विभूति-रुद्राक्षधारण आणि पंचाक्षरी (नम: शिवाय) वा षडक्षरी (ॐ नम: शिवाय) या मंत्राचा जप ही वीरशैवांची आचार-वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक वीरशैवाने प्रमादरहित होऊन, श्रद्धापूर्वक वीरशैवाचाराचे पालन केले पाहिजे, असा मन्मथस्वामींचा आग्रह आहे. त्यांनी आचरणावर दिलेला भर पाहिल्यावर परमरहस्य' हा वीरशैवांचा आचरण-कोश आहे, असे निस्संदेहपणे म्हणता येते.

मराठी संतसाहित्याशी सुसंवादी भाषाशैली
-----------------------------------------------
मन्मथस्वामींनी मराठी संतसाहित्याच्या परिभाषेत वीरशैव तत्त्वज्ञान सांगितले आहे, हे परमरहस्या'चे एक वैशिष्ट्य ठरावे. लिंग' म्हणजे शिव आणि अंग' म्हणजे जीव, शिव-जीव यांची एकरूपता म्हणजे लिंगांगसामरस्य'- अशी वीरशैवांची परिभाषा आहे. षडलिंगांचे विवेचन करताना त्यांनी महालिंग, प्रसादलिंग, जंगमलिंग, शिवलिंग, गुरुलिंग, आचारलिंग अशी; आणि षट्स्थल विवरिताना भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य अशी वीरशैव-परिभाषा योजिली आहे. परंतु सामान्यत: बद्ध-मुक्त, ब्रह्म-आत्मा-वस्तू, प्रकृति-पुरुष, मोक्ष अशी सर्वपरिचित वेदान्ताची परिभाषाच त्यांच्या रचनेतून डोकावू लागते. शिव हा सूक्ष्मचिदचिद्शक्तिविशिष्ट असतो आणि जीव हा स्थूलचिदचिद्शक्तिविशिष्ट असतो'- अशी वीरशैव परिभाषा, वीरशैव तत्त्वज्ञान समजून घेऊ पाहणा-या मराठी भाविकांना क्लिष्ट आणि रुक्ष वाटण्याचा संभव आहे, हे मन्मथस्वामींना जाणवले असावे. म्हणून श्लोकानुवाद करताना ते सिद्धान्ताची (वीरशैव तत्त्वज्ञानाची) परिभाषा योजितात आणि श्लोकार्थाचा विस्तार करताना वेदान्ताची परिभाषा योजितात. परमरहस्या'चा सूक्ष्म अभ्यास करणा-या जिज्ञासू वाचकांच्या हे ध्यानात येईल. लिंगांगसामरस्य' असा शब्दप्रयोग न करता ते मोक्षसंकल्पनेचे कसे बहारदार वर्णन करतात हे पाहण्यासारखे आहे:-
गंगा सागराशीं मिळाली । ती पुन्हा न परते सागरुचि झाली ।
तैसीं चित्तवृत्ति समरसलीं । पूर्णानंदीं शाश्वत ।। ४.६
ऐक्यस्थल या वीरशैव-संकल्पनेचे वर्णन त्यांनी मराठी संतसाहित्याशी सुसंवादी अशा शब्दांत कसे केले आहे ते पाहा:-
तें परब्रह्मचि मुसावलें । भक्तिसुखालागीं अवतरलें ।
वीरशैव नाम पावलें । ऐक्यस्थळ तें ।। १२.१०८
अशी अनेक स्थळे परमरहस्या'त दृष्टिगोचर होतात. याचा अर्थ असा की, मन्मथस्वामींनी संस्कृत परमरहस्या'चा केवळ शब्दानुवाद केला नाही, तर त्यातील वीरशैव तत्त्वज्ञान मराठी संतसाहित्याच्या मुशीत घालून ते आधी संस्कारित केले आणि मग मराठी वीरशैवांच्या पुढे ग्रंथरूपात ठेवले. मन्मथस्वामी केवळ भाषांतरकार नाहीत, तर सर्जनशील भाष्यकार आहेत. मराठी माणसाच्या गुणवैशिष्ट्यांशी व मर्यादांशी ते परिचित आहेत. मराठी लोकांना वीरशैव तत्त्वज्ञान किती प्रमाणात पचेल याची त्यांना जाण आहे, आणि या ग्रंथाच्या प्रसार-प्रचारातून किती परिवर्तन घडेल याचेही त्यांना भान आहे. म्हणून जो वीरशैव वारक-यांच्या कीर्तन-भजनात शांतिसुख शोधीत होता त्याच्यासाठी, त्याला परिचित असलेल्या भाषेतच वीरशैव तत्त्वज्ञान सांगण्याची आवश्यकता होती. असे केले नसते तर परब्रह्म-आत्मा-मोक्ष अशा भाषापरिघात वावरणा-या मराठी वीरशैवांना वीरशैव तत्त्वज्ञान परके वाटण्याचा संभव होता. मन्मथस्वामींनी द्रष्टेपणाने हे जाणले आणि मग अधूनमधून ज्ञानेश्वरीसदृश शब्दप्रयोग करीत, वेदान्त-परिभाषेशी जवळीक साधत त्यांनी वीरशैव तत्त्वज्ञान मराठीत आणले. म्हणून, मूळ श्लोकात नसतानाही त्यांनी
येणेंपरी भजनभक्ति करितां । सहज वस्तुकळा ये हातां ।
मग स्वयें होय वस्तुतां । परि भजन न सोडिजें ।। ७.३७
असे भजनभक्तीचे माहात्म्य गायिले आहे. ज्ञानेश्वरी-ओव्यांची आठवण करून देणा-या ओव्याही ते सहज लिहून गेले आहेत. काही उदाहरणे अशी:-
म्हणोनि अंतरीं ज्ञानें शुद्ध झाला । बाहेरी क्रियेनें क्षाळिला ।। १०.१२७
लिंगें बोलविल्या वेदु बोले । लिंगें हालविल्या सूर्य चाले ।
लिंगें हालविल्या वायु हाले । सत्तामात्रें ।। १४.५१

वीरशैव संकल्पनांचे स्पष्टीकरण
----------------------------------
असे असले तरी मन्मथस्वामींनी वीरशैव संकल्पना नेमक्या शब्दांत स्पष्ट केलेल्या आहेत. लिंगार्चनविधी (९.५०-५९), इष्टलिंग, प्राणलिंग व भावलिंग यांचे पूजन (११.४६-५८), षडलिंगांचे वर्णन (११.८६-११७), इष्टलिंगधारण व त्याची स्थाने (११.१२१-१२८), षट्स्थले (१२.२४-११०) ह्या विषयांचे विवरण त्यांनी नेमकेपणाने केले आहे. इष्टलिंग हेच वीरशैवाचे सर्वस्व, आराध्य असते, म्हणून त्याने इष्टलिंगाशिवाय अन्य स्थावरलिंगांचे पूजन करू नये, असे आपले स्पष्ट मतही त्यांनी नोंदविले आहे (१०.१७४). वीरशैवाच्या शरीरावर दीक्षासंस्कार झाल्यामुळे त्याचे स्थूल शरीर (मांसपिंड) दग्ध होऊन ते मंत्रशरीर (मंत्रपिंड) झालेले असते. त्यामुळे जे शरीर ज्ञानरूपी अग्नीत दीक्षासंस्कारप्रसंगी आधीच दग्ध झालेले असते, ते मरणोत्तर अग्नीत घालून दग्ध करू नये, असे स्पष्टीकरण मन्मथस्वामी देतात:-
जें दग्ध झालें तें काय जाळावें । जें पाक झालें तें काय शिजवावें ।
तैसें ज्ञानाग्नीनें दग्ध स्वभावें । त्यासीं दग्ध करूं नये ।। ५.७३
एकदा शिजवलेले अन्न पुन्हा शिजविले जात नाही, एकदा जाळलेली वस्तू पुन्हा जाळली जात नाही. म्हणून ज्ञानाग्नीत तत्त्वत: दग्ध झालेले वीरशैवाचे शरीर मृत्यूनंतर अग्नीत जाळले जात नाही. ते जमिनीत ठेवले जाते, पण तेही समाधि-अवस्थेत बसवून आणि हातावर लिंग देऊन, झोपवून नव्हे. लिंगार्चनेचे नित्य व्रत ज्याने जीवनभर आचरिलेले असते अशा वीरशैवाची मरणोत्तर शारीर स्थिती लिंगार्चनरत असणे स्वाभाविकच होय.

समारोप
---------
असा मन्मथस्वामींचा हा परमरहस्य' ग्रंथ वीरशैवांनी शिवागम व वेद यांसारखा पूज्य मानून संग्रही ठेवला पाहिजे. शोभेचे पुस्तक म्हणून नव्हे, तर पारायणग्रंथ म्हणून. श्रीधरस्वामींच्या शिवलीलामृता'ची वीरशैवांनी आजवर पारायणे केली ती त्या ग्रंथात भगवान शिवाचे गुणसंकीर्तन असल्यामुळे. तो ग्रंथ सामान्य शैवांप्रमाणे वीरशैवांनाही प्रिय वाटला. परंतु आता मात्र वीरशैवांनी सांप्रदायिक ग्रंथांची पारायणे करून आपल्या स्वत्वाची आणि धर्माचाराची ओळख करून घेतली पाहिजे. त्यासाठी परमरहस्य' हा आदर्श ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे मन्मथस्वामींची वाङ्मयी मूर्ती होय. या ग्रंथातून मन्मथस्वामी आपल्याशी बोलत राहतात, संवाद करतात, आपल्या मनातील शंका-कुशंकांचे सहजपणे निरसन करतात आणि तळहातावर आवळा ठेवून दाखवावा त्याप्रमाणे वीरशैव तत्त्वविचार व आचार सुगम करून सांगतात. आईला आपल्या लेकराच्या भवितव्याची चिंता असते तशी मन्मथस्वामींना मराठी वीरशैवांची वाटते. त्यांच्या चिंतेतून आणि वीरशैवोद्धाराच्या चिंतनातूनच परमरहस्या'ची निर्मिती झाली. त्यांचे वत्सल मातृरूप त्यांच्या साहित्यातून ठायीठायी प्रकट झाले आहे. त्यामुळेच आपण त्यांना मन्मथमाउली' असे संबोधतो. त्यांचे माउलीपण सार्थ ठरले आहेच, पण त्याबरोबर आपले लेकुरपणही सार्थ ठरावे यासाठी परमरहस्या'चा प्रसार-प्रचार केला पाहिजे. हा ग्रंथ विकत घेऊन आपल्या स्नेही-सुहृदांना भेट म्हणून दिला पाहिजे. त्याबरोबरच मन्मथस्वामींनी सांगितलेले वीरशैवाचरणही निष्ठेने केले पाहिजे. ग्रंथसमाप्ती करताना मन्मथस्वामींनी हा परमरहस्य ग्रंथ जें पाहाती । तें शिवरूप स्वयें होती ।' (१७.९०) अशी ग्रंथवाचनाची फलश्रुती सांगितली आहे. तसेच शिवगणीं परिसावा प्रीत्यर्थ । म्हणे मन्मथ कर जोडोनि' (१७.१०४) अशी हात जोडून, हा ग्रंथ प्रेमाने वाचावा, अशी विनंतीही केली आहे. मन्मथस्वामींची विनंती वीरशैवांनी ऐकायची नाही तर कोणी ऐकायची?
या परमरहस्या'चे वैशिष्ट्य असे की, हा ग्रंथ शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांप्रमाणे मुद्रित करण्यात आला आहे. परमरहस्या'चे शुद्धलेखन जुन्या नियमांप्रमाणेच असायला हवे. हा ग्रंथ अनुच्चारित अनुस्वार, तत्सम शब्दांची -हस्वान्त रूपे इ. शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांप्रमाणे छापला आहे. हे कार्य सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. रेवणसिद्ध राचप्पा मगाई यांनी माझ्यासमवेत अत्यंत परिश्रमाने पूर्णत्वास नेले आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथातील संस्कृत श्लोकांचे शुद्धीकरणही संस्कृतज्ञ पं. शिवाप्पा खके यांच्याकडून करून घेतले आहे. हे सर्वजण मन्मथभक्तांच्या धन्यवादास पात्र आहेत.
मन्मथस्वामींच्या परमरहस्या'चे आणि अन्य वीरशैव संतसाहित्याचे पुन:पुन्हा प्रकाशन करून हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. संतसाहित्याचे प्रकाशन कोणीही करू शकतोे, त्यासाठी कोणाच्या अनुमतीची गरज नसते. आपले तत्त्वज्ञान आणि विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत अशी ज्या ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा असते तो ग्रंथ, ‘अमक्यानेच छापावा, तमक्याने छापू नये' असे म्हणायचा अधिकार कोणालाही नसतो. त्यामुळे परमरहस्य' घरोघरी पोहोचविण्याचा जे कोणी प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या कार्याचे सर्व वीरशैवांनी मुक्त मनाने स्वागत केले पाहिजे. शेवटी
... हा शिवाचारी शिवभक्तीं ऐकावा ।
ऐकोनि जीवीं धरावा । तैसाचि करावा आचारु ।। १७.९२
...‘परमरहस्य' शिवभक्तांनी श्रद्धापूर्वक श्रवण करून त्याला आपल्या हृदयात अढळ स्थान द्यावे आणि ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आचरण करावे... ह्या संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामींच्या शब्दांची आठवण देऊन प्रस्तावना पूर्ण करतो. 
-डॉ. शे. दे. पसारकर
अध्यक्ष,
पहिले अ. भा. वीरशैव मराठी साहित्य संमेलन, लातूर


1 comment: