Saturday, 28 December 2013

वीरशैव मराठी वाङ्मय : निर्मिति-प्रेरणा आणि स्वरूप

वीरशैव मराठी वाङ्मय : निर्मिति-प्रेरणा आणि स्वरूप

डॉ. शे. दे. पसारकर (https://www.facebook.com/shashi.pasarkar?hc_location=stream)
अध्यक्ष,
पहिले अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलन, लातूर
प्रास्ताविक
वीरशैव मराठी वाङ्मयाची समृद्धी अलीकडे दृष्टिपथात येऊ लागली आहे. या वाङ्मयाचे एक संमेलनही नुकतेच लातूर येथे पार पडले. म० बसवेश्वरांच्या पूर्वकालातच महाराष्ट्रात वीरशैव संप्रदाय प्रतिष्ठित झाला होता असे साधार म्हणता येते. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा ह्या गावी असलेल्या श्रीपलसिद्ध बृहन्मठाची स्थापना इ० स० १०५८ मध्ये झाली, असा उल्लेख आढळतो. म० बसवेश्वरांचे जन्मवर्ष ११०५ असल्याचे एक मत आहे, तर ते ११३२ असल्याचे दुसरे मत आहे. यावरून वीरशैव संप्रदायाचा आणि वीरशैव समाजाचा वावर दहाव्या-अकराव्या शतकापासून आजच्या महाराष्ट्रात होता असे अनुमान काढता येते. यादवांच्या राज्यव्यवस्थेत वीरशैवांना उच्चाधिकार मिळाल्याची उदाहरणे आहेत. महादेव यादवाचा महाप्रधान देवराज आणि रामदेवरायाचा सेनापती चाउंडरस हे वीरशैव संप्रदायाचे अनुयायी होते. देवराजाने सोलापुरातील सिद्धरामेश्वरांनी स्थापिलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पूजेअर्चेसाठी एक गाव इनाम दिल्याची नोंद संगुर शिलालेखात (शके ११२६) आहे. याचा अर्थ असा की, मराठीच्या प्रारंभकाळीच वीरशैव समाज महाराष्ट्राशी आणि मराठीशी एकरूप झालेला होता.
म० बसवेश्वरांचे क्रांतिकेंद्र कल्याणी (बसवकल्याण) मराठी सीमेला लागून होते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील मंगळवेढे येथे बसवेश्वरांचे वास्तव्य होते आणि तेथेच नवसमाजनिर्मितीच्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल टाकले. त्यांच्या वैचारिक जडणघडणीत मराठी भूमीचा वाटा होता. मराठी राज्यकर्त्यांनी आजच्या कर्नाटकात सत्ताविस्तार केला होता आणि कानडी राज्यकर्त्यांनी आजच्या महाराष्ट्रातील काही भागांत आपली सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन्ही प्रांतांत मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. त्याचे प्रतिबिंब मराठी वाङ्मयात आणि विशेषत: वीरशैव मराठी वाङ्मयात पडलेले दिसून येते.

वीरशैव मराठी वाङ्मय : निर्मिति-प्रेरणा

मराठीच्या प्रारंभकाळातील वीरशैव वाङ्मय उपलब्ध झालेले नाही. परंतु, तेराव्या शतकातील ‘विसोबा खेचर-विरचित षट्स्थल (शडूस्छळि)' हा यादवकालीन ग्रंथ मात्र उपलब्ध झाला आहे. या ग्रंथात वीरशैवांच्या षट्स्थल-सिद्धान्ताचे प्रतिबिंब पडलेले आढळते. वीरशैवांचा संप्रदायमान्य षट्स्थल-सिद्धान्त जसाच्या तसा येथे आढळत नाही, परंतु हा ग्रंथ वीरशैवप्रभावित आहे हे मान्य करावे लागते. त्यामुळे उपलब्ध वीरशैव मराठी वाङ्मयातील पहिलेपणाचा मान या ग्रंथाकडेच जातो. त्यानंतर मात्र अडीच-तीन शतके वीरशैवांच्या मराठी वाङ्मयमंदिरात नकारघंटाच वाजताना दिसते. या काळातील वीरशैव वाङ्मय कालौघात नष्ट तरी झाले असेल, किंवा ज्ञानदेव-नामदेव-एकनाथादी प्रभावी संतपरंपरेपुढे हा संप्रदाय कसाबसा तग धरून राहिला असल्यामुळे वाङ्मयनिर्मितीच झाली नसेल. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र वीरशैवांचे मराठी वाङ्मय विपुल प्रमाणात आणि कसदारपणे निर्माण झालेले दिसते. सोळाव्या शतकापासून निर्माण झालेल्या वीरशैव मराठी वाङ्मयाच्या आधारेच त्याच्या निर्मिती-प्रेरणा स्पष्ट करता येतात.

१. अस्मितेचे पोषण

सोळाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीच अशी होती की त्यामुळे वीरशैव संतकवींना वीरशैवांच्या अस्मितेला आवाहन करावे लागले आणि तिचे पोषणही करावे लागले. सुलतानी सत्तेची दहशत आणि वारकरी संप्रदायाचे आकर्षण यांमुळे महाराष्ट्रातील वीरशैव संप्रदायाचे अस्तित्वच संपण्याचा त्या काळात धोका होता. त्यामुळे मन्मथादी वीरशैव संतकवींनी वीरशैवांची सांप्रदायिक अस्मिता जागी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अस्मितेचे पोषण करण्यासाठी अभंगरचना आणि ग्रंथरचना केली.

‘सदा भस्म लावा भाळी। लिंग पूजा बिल्वदळी।।'

‘जयाचीये वाचें नये शिवनाम। तो जाणा अधम महादोषी।'

‘इष्टलिंग हृदयावरी। अन्य देवा नमस्कारी।।
महा पाप तया जोडें। तेणें अध:पात घडे।'

‘शिव शिव म्हणतां वाचें। काय गेलें तुझ्या बाचे।'
‘सांडोनी स्वधर्म परधर्मीं रत। पाप तें तयास आचरतां।'
‘निजूं नका जागा जागा। आपुल्या स्वधर्मानें वागा।'
‘सांडोनी शिवातें दुजियातें ध्याती।
त्याचें तोंडीं माती जन्मोजन्मी।।'
‘शिव तोची देव येर ते सेवक। विष्णुब्रह्मादिक सुरासुर।।'
‘शिवभक्ताचे कुळीं जन्मुनी करंटा। न भजे चोरटा शंकरासी।।
छपवूनी लिंगा घाली तुळशीमाळ। जन्मला चांडाळ मातेगर्भी।।'

अशी कठोर वचने मन्मथवाणीतून प्रकटली ती वीरशैवांची अस्मिता जागी करण्याच्या उद्देशाने! त्यांनी ‘परमरहस्य' हा भाष्यग्रंथ रचला तोही वीरशैवांची आचारसंहिता आचारशून्य वीरशैवांच्या समोर ठेवण्यासाठी. परपंथप्रवेशासाठी उतावीळ झालेल्या स्वजनांना त्या धर्मपंथातील ज्याचे म्हणून आकर्षण वाटले ते सर्व मन्मथादी संतकवींनी वीरशैव संप्रदायात आणले. ‘हरिपाठा'प्रमाणे ‘शिवपाठ' आणला, सांप्रदायिक भजने रचली, कीर्तन परंपरा निर्माण केली. हरिभक्तपरायण मंडळीप्रमाणे शिवभक्तपरायण माणसे तयार केली. भारूडाप्रमाणे गबाळरचना केली. एवढेच नव्हे तर लिंगरूपात पूजिल्या जाणाऱ्या शिवाला त्यांनी
‘भाळी भस्म चंद्रकळा। गळां शोभे रुंडमाळा।।
गौरवपु शुभ्रकांती। अंगी चर्चिली विभूती।।'
अशा सगुण-साकार रूपात उभे केले. वारकरी संप्रदायाशी समांतर अशीच ही वाटचाल होती. यावरून अस्मितेचे पोषण ही वीरशैव मराठी वाङ्मयाची निर्मिति-प्रेरणा होती असे म्हणता येते.

२. संप्रदाय-विचाराची ओळख
संप्रदाय-विचाराची ओळख करून देणे ही वीरशैव मराठी वाङ्मयाची दुसरी निर्मिति-प्रेरणा होय, हे परमरहस्य, विवेकचिंतामणी, शिवागम, सिद्धान्तसार, वीरशैवधर्मनिर्णयटीका, अष्टावरणमाहात्म्य, शिवागमोक्तसार, शिवरहस्य, वीरशैवतत्त्वसारामृत इत्यादी ओवीबद्ध ग्रंथांची निर्मिती पाहिल्यावर पटते. शक्तिविशिष्टाद्वैत, षट्स्थल-सिद्धान्त, अष्टावरण व पंचाचार हे वीरशैव विचारविश्वाचे चार स्तंभ आहेत. ओवीग्रंथांमधून आणि अभंगादी स्फुट रचनांमधून वीरशैव संतकवींनी त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी संस्कृत व कन्नड ग्रंथांचा त्यांनी आधार घेतला आहे. केवळ विचाराचीच ओळख करून देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी संप्रदायाचे आचरण केलेल्या श्रेष्ठ पुरुषांची चरित्रेही ओवीबद्ध केली आहेत. त्यामध्ये अल्लमप्रभू, म. बसवेश्वर, सिद्धरामेश्वर, मन्मथस्वामी, हावगीस्वामी आदी संतपुरुषांचा आणि शिवभक्तांचा समावेश आहे. शिवशरणांचा आत्मसंवाद असलेल्या कन्नड वचनांचेही मराठी अनुवाद याच प्रेरणेतून झालेले आहेत.

३. भक्तिभावनेचे प्रकटीकरण
भक्तिभावनेचे प्रकटीकरण ही वीरशैव मराठी वाङ्मयाची आणखी एक निर्मिति-प्रेरणा आहे. त्यांची अभंगकविता आत्मसंवादाच्या पातळीवर वावरते. अभंगांतून शंकराचे रूपचित्र रेखाटताना त्यांच्या भक्तिभावनेला भरते येते. त्याच्याशी लडिवाळ सलगी करताना, त्याच्या नामामृतात चिंब होताना
‘अंतरी बैसुन सुख द्यावे मज। आनंदाची भूज नाचवीन।।
नाचवीन मन तुझिया चरणी। गाईन कीर्तनी नाम तुझे।।'
अशी त्यांची आनंदविभोर अवस्था होते.
‘शिव नाद शिव छंद। वाचें शिव स्मरावा।।
शिव अवघा प्रेमानंद। सदाशिव स्मरावा।।'
अशा शब्दरूपात त्यांच्या अंत:करणातली भक्तिभावना साकार होते. आत्मनिवेदन, प्रेमकलह, करुणा, शिवभक्ती, उपदेश, स्वानुभव, गुरुगौरव, शिवगौरव अशा अनेक पैलूंनी मंडित झालेल्या वीरशैव अभंगवाणीमागे भक्तिभावनेला शब्दरूप देण्याची निखळ प्रेरणा आहे.

सुसंवाद आणि समन्वयशीलता
------------------------------------
वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झालेल्या स्वजनांना थोपवणे हे जरी वीरशैव मराठी संतांचे उद्दिष्ट होते तरी त्यांनी अन्य संप्रदायांशी कधी संघर्ष केल्याच्या खुणा त्यांच्या वाङ्मयात आढळत नाहीत. उलट, वीरशैव संतकवींनी निर्मिती करताना मराठी संतसाहित्याशी सुसंवादी शैलीच उपयोजिली असे दिसते. वीरशैव संकल्पनांचे स्पष्टीकरण त्यांनी नेमकेपणाने आणि नेटकेपणाने केले. परंतु जो वीरशैव वारकऱ्यांच्या कीर्तन-भजनांत शांतिसुख शोधत होता त्याच्यासाठी, त्याला परिचित असलेल्या भाषेतच वीरशैव संकल्पना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लिंग (शिव) आणि अंग (जीव) यांची समरसता म्हणजे ‘लिंग\गांगसामरस्य.' परंतु हा पारिभाषिक शब्द न योजता मन्मथस्वामींनी मराठी संतसाहित्याशी सुसंवादी भाषेत मोक्षसंकल्पनेचे बहारदार वर्णन केले आहे--
‘गंगा सागराशीं मिळाली। ती पुन्हा न परते सागरुचि झाली।
तैसी चित्तवृति समरसली। पूर्णानंदी शाश्वत।।'परमरहस्य, ४.६
किंवा ‘ऐक्यस्थल' या संकल्पनेचे वर्णन पाहा--
‘ते परब्रह्मचि मुसावले। भक्तिसुखालागीं अवतरले।
वीरशैव नाम पावले। ऐक्यस्थल ते।। १२.१०८'
श्लोकानुवाद करताना मन्मथस्वामी सिद्धान्ताची (वीरशैव तत्त्वज्ञानाची) परिभाषा योजितात आणि श्लोकार्थाचा विस्तार करताना वेदान्ताची परिभाषा योजितात, हे ‘परमरहस्या'चा सूक्ष्म अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या लक्षात येईल. हे सर्वच वीरशैव संतकवींच्या वाङ्मयात आढळून येते. याचा अर्थ असा की, वीरशैव संतकवींचे वाङ्मय हे वीरशैवांचे सांप्रदायिक वैशिष्ट्ये एका बाजूने नोंदविते तर दुसऱया बाजूने ते वारकरी संतसाहित्याशी सुसंवादही करते. कन्नड आणि संस्कृत भाषांतील ग्रंथांचा अनुवाद असलेल्या वीरशैव मराठी संतांच्या रचना अस्सल मराठी वळणाच्या आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
सुसंवादाप्रमाणेच विचारातील समन्वयशीलतेचा आढळ ह्या वाङ्मयात होतो. प्रारंभी मन्मथस्वामींच्या अभंगातील ‘हरि हर ऐसा नामी आहे भेद' असा शिव आणि विष्णू यांच्यातील भेद स्पष्ट करणारा विचार पुढील काळात
‘हरिहरा नाही द्वैत। व्यर्थ वादकाचे मत।।
जैसी ब्रह्म आणि माया। तैसी पुरुषाअंगी छाया।।
मायपीठ पांडुरंग। वरी ब्रह्म शिवलिंग।।' (शिवदास)
असा समन्वयशील झाला. भांडणाऱ्यांना भांडू द्या, पण आपण मात्र निरर्थक निंदेपासून अलिप्त राहावयास हवे, असे शिवदास तळमळीने सांगतात--
‘शिव थोर विष्णु थोर। ऐसे भांडो भांडणार।।
आम्हीं न लागूं त्या छंदा। व्यर्थ कोण करी निंदा।।'
वीरशैव संतकवी लक्ष्मण महाराज तर पंढरीच्या पांडुरंगावर एक तुलसीदलही वाहतात--
‘भवनाशनी पंढरी। पाहू चला हो झडकरी।।
पूर्णब्रह्म तो श्रीहरी। भीमातटी शोभतसे।'
प्रत्येक पंथाचे तत्त्वज्ञान आणि उपासनापद्धती भिन्न असली तरी त्यांचे परमध्येय एकच असते. नाम-रूपभेदाने उपास्य वेगळे भासले तरी भक्तितत्त्व समानच असते, याची वीरशैव संतांना स्वच्छ जाणीव होती. म्हणूनच त्यांच्या वाङ्मयातून उपासनेच्या कट्टरपणाबरोबरच हरिहरसमन्वयाचे बोलही घुमताना ऐकू येतात.

वीरशैव मराठी वाङ्मयाचे स्वरूप
--------------------------------------
वीरशैव मराठी वाङ्मयाचे स्वरूप वैविध्यपूर्ण असून त्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते.
(अ) ओवीग्रंथ : १. संस्कृत ग्रंथांवरील टीकाग्रंथ, २. संस्कृत व कन्नड ग्रंथांचे अनुवाद, ३. चरित्रपर ग्रंथ, ४. स्वतंत्र ग्रंथ.
(आ) अभंगरचना : १. स्फुट अभंग, २. कथात्मक अभंग, ३. चरित्रपर अभंग.
स्फुट अभंगांत गुरुगौरव, शिवगौरव, आत्मनिवेदन, उपदेश, विरहिणी, प्रेमकलह, करुणा असे कितीतरी विभाग करता येतात.
(इ) स्फुट रचना : १. लोकसाहित्य, २. अन्य स्फुट रचना.
लोकसाहित्यात भारूडे, वडप qकवा खापरी गीते, डफगाणे, डोलोत्सव गीते, लावणी, पोवाडा असे प्रकार आहेत.
भारूडांत जोहार, फुगडी, शरणार्थ, पिंगळा, बसवी, व्यभिचारिणी, ताकीदपत्र, नवरा, कोल्हाटीण, बाळसंतोष, भोळी, जागल्या, जोगवा, गोंधळ, वासुदेव, कापडी, सलाम, लखोटा, सौरी, मोहिनी, पाल, भूत, आग, चोर, सर्प, दरोडा, विंचू, फकीर, आंधळा, हलवाई, नटवा, पैलवान, पतिव्रता, उंदीर, घूस, तंटा, जोशी, होरा, पांगळा, चिरटे, जोकमार, म्हातारी अशी कित्येक भारूडे आहेत.
अन्य स्फुट रचनेत स्तोत्रे, पद, आरती, भूपाळी, अष्टक, पाळणा, गीत, कटाव आदी प्रकार आहेत.
पदांमध्ये मराठी, हिंदुस्थानी, हरदासी व कथात्मक पदांचा समावेश होतो.
यावरून वीरशैव मराठी वाङ्मयाचे वैविध्य आणि वैपुल्य लक्षात यावे.
वीरशैव मराठी संतकवींची आणि भक्तकवींची एक सुदीर्घ अशी परंपरा महाराष्ट्रात आढळते. सोळाव्या शतकात होऊन गेलेले संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामी आणि त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी विपुल वाङ्मय निर्मिले आहे. सोळाव्या शतकातच शिखरशिंगणापूर येथे शांतलिंगस्वामींनी मराठीत वीरशैव साहित्यनिर्मिती केली. जाणिवपूर्वक हे साहित्य समृद्ध करणाऱ्या संतकवींच्या आणि भक्तकवींच्या नावांची नोंद येथे करणे आवश्यक वाटते. मन्मथस्वामी, शांतलिंगस्वामी, लिंगेश्वर, बसवलिंग, सत्यात्मज, लक्ष्मण महाराज, शिवदास, महादेवप्रभू, काशीनाथ सुपेकर, वीरनाथ महाराज, गंगाधरस्वामी वडांगळीकर, शंकर मृगेंद्र स्वामी, मल्लनाथ महाराज, चन्नाप्पा वारद, बाळाबुवा कबाडी, विरूपाक्षप्पा शेटे, शिवगुरुदास, बसवदास, शंभू तुकाराम, आप्पा स्वामी, पंचाक्षरी स्वामी, गुरुदास आणि वीरशैव भक्तकवयित्री भावंडीबाई आदी कवींनी वीरशैव मराठी वाङ्मयाची निर्मिती केली आहे.
वीरशैव मराठी साहित्याच्या निर्मितीला सोळाव्या शतकाच्या अखेरीस प्रारंभ झाला, ती निर्मिती आजही अव्याहत चालूच आहे. आजच्या पिढीतील अनेक लेखक-कवी आपापल्या परीने वाङ्मयनिर्मितीची ही परंपरा पुढे चालवीत आहेत. ओवी-अभंग आजही लिहिले जात आहेत. कादंबरी, नाटक, कविता, कथा, चरित्र अशा ललित वाङ्मयप्रकारांतही वीरशैव मराठी वाङ्मयाची निर्मिती होत आहे. संस्कृत ग्रंथांचे व कन्नड वचनांचे अनुवाद, वीरशैव सत्पुरुष आणि समाजातील कर्तृत्वसंपन्न पुरुष यांचे चरित्रलेखन, वीरशैव मराठी वाङ्मयाची संपादने, समीक्षा, प्रबंध यांची निर्मिती अजूनही होत आहे. मध्ययुगीन काळात उगम पावलेली ही साहित्यधारा अजूनही वाहते आहे. ती थांबली नाही, आटली नाही, साचलीही नाही. आपली निष्ठा न सोडता वाक-वळणे घेत ती वाहत राहिली.

ओवीग्रंथ
------------
ओवीग्रंथांचे जे तीन प्रकार पडतात, त्यामध्ये परमरहस्य, गुरुगीता, शिवानंदबोध, वीरशैवधर्मनिर्णयटीका, अष्टावरणमाहात्म्य, शिवरहस्य इत्यादी संस्कृत ग्रंथांवरील टीकाग्रंथ होत. विवेकचिंतामणी, कर्णहस्तकी, लीलाविश्वंभर आदी कन्नड ग्रंथांचे अनुवाद आहेत. शिवकथामृत, सिद्धान्तसार, शिवागमोक्त्तसार, लिंगानंदबोध, ब्रह्मोत्तरखंड, शिवागम, वीरशैवतत्त्वसारामृत, गुरुमाहात्म्य असे संस्कृत ग्रंथाधिष्ठित ग्रंथ आहेत. सिद्धेश्वरपुराण, बसवपुराण, वीरशैवलीलामृत, बसवेश्वराख्यान, हावगीलीलामृत, श्रीबसवचरित्रामृत, बसवगीतापुराण, श्रीमन्मथचरितामृत, श्रीरमतेरामकथामृत इत्यादी चरित्रपर ग्रंथ आहेत आणि षट्स्थल, शांतबोध, अनुभवानंद, स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, निजात्मसार असे स्वतंत्र ग्रंथही आहेत.
हया ओवीग्रंथांतील वाङ्मयीन वैशिष्ट्यांची समीक्षा अभ्यासकांनी आपापल्या परीने केली आहे. व्यक्तिदर्शन, संवादकौशल्य, प्रवाही निवेदन, विचार-भाव-कल्पना यांचे सौंदर्य, अलंकार आणि प्रतिमासृष्टी, त्यातील समाजदर्शन, प्रासादिकता या कसोट्यांवर यातील काही ग्रंथ निस्संशय उजवे ठरतात. सहजस्फूर्त आणि रसमय ओव्या वाचताना त्यांतील अर्थ सहजपणे उलगडत जातो. नमुन्यादाखल काही ओव्यांचा उल्लेख करतो. ‘परमरहस्या'त आपल्या भक्तांचे कौतुक करताना शंकर म्हणतात--
‘सीवकथा सीवगोष्टी। सांगतां उल्हास न माय पोटी।
तथापें मी धुर्जेटी। सदां तीष्ठतुसे।।१५.१२२
तें माझें अति जीवलग। तें आत्मा मी त्यांचे आंग।
तया मज वियोग। कदां नाही।।१२३
त्यां सत्यशरणांचा मी अंकित। तो चाले की मी खडे वेचीत।
मी त्या भोवता भोवत। वीघ्न वारीत तयाची।।१२५
जयासी तो वचन देईल। म्हणे जाय तुझे बरे होईल।
तया मज द्यावे लागेल। तो म्हणेल तेची।।१२६
त्याचे आह्मासी ध्यान। त्याचें आह्मा स्मरण।
त्याचें आह्मीं चरण। हृदयी धरुं।।१२८'
‘ज्ञानेश्वरी'तील ओव्यांची आठवण करून देणाऱ्या या ओव्या आहेत. विस्तारभयास्तव अधिक उदाहरणे देणे शक्य नाही. ओवीग्रंथांतील बहुतेक कवींची रचना प्रसाद-माधुर्यादी काव्यगुणांनी युक्त आहे. प्रतिपाद्य विषय श्रोत्यांच्या मनावर बिंबविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आढळते. रसिकांचे रंजन करणे हे त्यांच्या रचनेचे ध्येय नसले तरी प्रतिपाद्य विषयांचे सुगम विवरण करताना अधूनमधून काव्यालंकारांची पखरण हे ग्रंथकार करतात आणि आपले प्रतिपाद्य आस्वाद्य बनवितात. समाजजीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे व्यभिचारिणी, कुलवधू, मोळीविक्या, भाटनागर, बहुरूपी, कैकाड्याचे माकड, बासरीवादक आदी प्रतिमांचा ते वापर करताना दिसतात. यातील निवडक ओवीग्रंथांचा स्वतंत्र अभ्यास करून त्यांची वाङ्मयीन महत्ता स्पष्ट करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

अभंगरचना
---------------
वीरशैवांचे अभंगवाङ्मय समृद्ध असून ते २०,००० पेक्षा अधिक संख्येने उपलब्ध झाले आहे. मन्मथस्वामी हे पहिले अभंगकार. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक कवींनी अभंगरचना केली. वीरशैवांची अभंगवाणी ही वारकरी संतांच्या अभंगवाणीबरोबरच नांदण्याच्या योग्यतेची आहे, असा समीक्षकांचा अभिप्राय आहे. त्यामध्ये आत्मनिवेदन, गुरुगौरव, शिवगौरव, शिवपाठ, करुणा, प्रेमकलह, विरहिणी, अद्वैत, योग, पूजन-भजन-कीर्तन, मनोबोध, वाचेस बोध, स्वानुभव, उपदेश असे सर्व पैलू समाविष्ट आहेत. त्यातील काही मधुर नमुने पाहा--
परमार्थ हा नोहे लेकराच्या गोष्टी। येथें व्हावा पोटी अनुताप।।
दगडाहून जीव करावा कठीण। अंतरींचा शीण सांडूनिया।। (बसवलिंग)
तृषाक्रांता जैसी जीवनाची गोडी। तैसी तुझी गोडी लागो मज।।
तारुण्यी वनिता भ्रतारा आवडी। तैसी तुझी गोडी लागो मज।। (लिंगेश्वर)
तुज पहातां शंकरा। सुख झालें विश्वंभरा।।
झाला सुखाचा सुकाळ। दु:ख गेले हे सकळ।। (लक्ष्मण)
पाहुनियां नीलकंठा। डोळां धरियेला ताठा।।
प्रेमें सुखाचें उमाळें। जैसा सिंधु उचंबळें।। (शिवदास)
देऊळा आधार देवाचाची झाला। देवळाने केला देव उभा।।
देवे आणियेली देऊळासी शोभा। देऊळाची प्रभा देवावरी।। (मन्मथ)
सुंदर रूपडे दिसे दृष्टीपुढें। मन झालें वेडें मन झालें वेडें।। (महादेवप्रभू)
अशी किती उदाहरणे सांगावीत? वीरशैव संतकवींचे भक्तिबहळ मन, त्यांची समाजविषयक कळकळ, दांभिकावर त्यांनी केलेले प्रहार, त्यांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची पारंपरिक परंतु समृद्ध प्रतिमासृष्टी यांचे दर्शन त्यांच्या अभंगवाणीत घडते.
एका अभंगात संक्षिप्तपणाने अथवा अनेक अभंगांत विस्ताराने शिवभक्तांच्या अनेक कथा या संतकवींनी शब्दबद्ध केल्या आहेत. मृत झालेल्या चोराच्या मस्तकावर एका कुत्र्याने राखेने भरलेला पाय ठेवला, त्यामुळे त्याला त्रिपुंड्रधारणेचे पुण्य लाभले आणि तो चोर शिवलोकी गेला. ही कथा मन्मथस्वामींनी एकाच अभंगात सांगितली आहे. लिंगेश्वरांनी अशाच चार कथा चार अभंगांतून वर्णिल्या आहेत. परंतु लक्ष्मण महाराजांनी मात्र एका कथेवर अनेक अभंगांचा साज चढवून त्या रंगवून-खुलवून सांगितल्या. लक्ष्मण महाराजांनी स्कंदपुराण, शिवपुराण, बसवपुराण, शिवरहस्य आदी ग्रंथांतील भोळ्या शिवभक्तांच्या कथा अभंगबद्ध केल्या. या कथा अभंगबद्ध करताना त्यांनी मूळ कथांचा कोठे संक्षेप केला तर कोठे विस्तार केला. पुराणसंदर्भ असलेल्या कथांत आपल्या भोवतीच्या समाजजीवनाचे रंग भरले आणि संस्कृत-कन्नडमधील कथांवर मराठी साज चढवून त्या मराठी वाचकांपुढे ठेवल्या.
या सर्व कथांतून शिवभक्तीचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केलेले आहे. शिवपूजन नकळत घडले तरी त्यामुळे पापात्म्याचा उद्धार होतो, हे भक्तिसूत्र लक्ष्मण महाराजांना सर्वांच्या मनावर बिंबवायचे आहे. वाल्ह्याचा वाल्मीकी होतो, या भारतीय परंपरेने मान्य केलेल्या परिवर्तनाची नोंद या कथांतून ते पदोपदी करीत आहेत असे जाणवते. त्यांच्या काही कथांची शीर्षके वाचली तरी याची कल्पना येईल. जार पुरुष, पातकी ब्राह्मण, पातकी भिल्लीण, भ्रष्टाचारी ब्राह्मण, दुष्ट भिल्ल इत्यादी. दुष्कर्मरत स्त्री-पुरुषांचा देखील शिवभक्तीने उद्धार होतो हे या कथांतून वर्णन करीत शिवभक्तीचे सर्वोत्तमत्व व सुलभता लक्ष्मण महाराज गर्जून सांगतात. याबरोबरच बिज्जमहादेवी, शिवभक्त बालिका, शिवभक्त धनगरपुत्र, महाशैव ब्राह्मण, शिवभक्त गोपबालक अशी शिवार्चनरत भक्तचरित्रेही त्यांनी रंगवून, रंगून सांगितली आहेत. काही कथांतून दुष्प्रवृत्त पुरुषांचे सच्छील शिवभक्तात परिवर्तन होते असा दिलासा ते देतात, तर काही कथांतून शिवभक्त पुरुषाचा आदर्श डोळ्यांसमोर उभा करतात.
लक्ष्मण महाराजांच्या कथात्मक अभंगांची धाटणी पौराणिक वळणाची असली तरी तत्कालीन समाजातील विविध प्रवृत्तींचे चित्रणही त्यांच्या अभंगांत आढळते. आपल्या मुलाला असाध्य रोग झाला म्हणून शोक करणारी बिज्जमहादेवी आपले हृदय पिळवटून टाकते. मुलाच्या मृत्यूने शोकाकूल झालेली तत्कालीन माताच त्यांनी आपल्यापुढे उभी केली आहे असे वाटते. शिवलिंगाला दूध पिण्याचा आग्रह करणारी बालिका, शंकराला वेड्यात काढणारा भोळा रुद्रपशुपती, जारिणीचा अनुनय करणारा जारपुरुष, रुसून बसलेली जारिणी, खोटे बोलून अवगुणी मुलाला पाठीशी घालणारी आई, कामातुर पतीला स्त्रीदेहातील अमंगळपण पटवून देणारी पत्नी, मद्यपान करून उन्मत्त झालेली भिल्लीण, सर्वांगावर कुष्ठ उठलेला रोगी अशी विविध पात्रे लक्ष्मण महाराजांनी कथात्मक अभंगांतून उभी केली आहेत. लक्ष्मण महाराज ज्या समाजात वावरत होते त्या समाजातील ही पात्रे होती, असे म्हणता येते. कथात्मक अभंगांत निवेदनकौशल्य आहे. क्वचित् काही ठिकाणी पाल्हाळिकता जाणवत असली तरी कथौघ पुढे पुढे वाहत राहतो. ही रचना प्रासादिक आहे, अर्थसुभग आहे. प्रसंगनिर्मिती, स्वभावरेखन, संवादलेखन ही कथेची वैशिष्ट्ये या अभंगांत आढळतात.
संतपुरुषावर चरित्रपर अभंगही अनेकांनी लिहिलेले आहेत.

स्फुट रचना
---------------
स्फुट रचनेत लोकसाहित्य म्हणता येईल अशी भारूडे, वडप, डफगाणे, डोलोस्तव गीते, लावणी, पोवाडा आदी प्रकार समाविष्ट आहेत. यांतून लोकमानसाची विविध रूपे प्रकट होतात. लोकसाहित्य अधिकांशाने मौखिक असले तरी थोड्या प्रमाणात ते लिखित स्वरूपातही उपलब्ध झाले आहे. ‘जोहार मायबाप जोहार।' या भारूडातून मन्मथस्वामींनी देहगावच्या पाटलाचा भोळा कारभार वर्णन केला आहे. शिवदासांनी देहनगरच्या मनाजीपंत कुलकर्ण्याला ताकीदपत्र दिले आहे. त्यांत गावाची खराबी केली, परमार्थाच्या वाटा बंद केल्या, म्हणून तुम्हाला धरणे येईल अशी भीती घातली आहे. लक्ष्मण महाराजांचा ‘पिंगळा' कलियुगात कोणते अनर्थ होतील याचे भविष्यकथन करतो--
‘काळ आला दुर्धर। धर्म बुडेल फार।
फार होतील जारचोर। अल्पआयुष्यी नर।।
लेक मारील बापाला। स्त्री भ्रताराला।
शिष्य वधील गुरूला। मोठा दिसे हा घाला।।'
या वर्णनातील सत्य आजही पटण्यासारखे आहे. चन्नांनी, शिवदासांनी अनेक भारूडे लिहिली आहेत. सदानंद जोडजवळेकरांचे एक जळजळीत भारूड असे आहे--
‘थूऽ रांड थूऽ तुझ्या तोंडावर थूऽ ।।
परधर्मअभिलाषी व्यभिचारिणी तू।।धृ.।।
ज्याचे संगे लग्न केले, सुख नाही बोला।
बळे जशी लोकापाशी, घर देशी त्याला।।१।।
दाणे नसता भांडून मागे आपल्या नवऱ्याला।
पलंगावरी सुख देई पहा आणिकाला।।२।।
अंग सती, लिंग पती वीरशैवा झाली।
अलिंगीशी शरण जाशी लाज कोठे गेली?।।३।।'
या लोकसाहित्याला ‘गबाळ' अशीही एक संज्ञा आहे.
वीरशैवांत विवाहप्रसंगी ‘खापरीची गीते' म्हटली जातात. त्याला गुग्गळ, धूप जाळणे असेही म्हणतात. त्यावेळी जी गीते म्हणतात ती वडप होत. हा पथनाट्यासारखा एक प्रकार आहे. गीताच्या शेवटी ‘अहा रे वीरा' असा घोष केला जातो.
मन्मथस्वामींची ‘कराडच्या देवीवरील लावणी' प्रसिद्ध आहे. ते महाराष्ट्रातील पहिले लावणीकार ठरले आहेत. अशा प्रकारे पोवाडे, पदे, पाळणे, गीते, आरत्या, भूपाळ्या, अष्टके, स्तोत्रे अशी कितीतरी वीरशैवांची स्फुट रचना उपलब्ध आहे. श्रीराम गुळवणे यांच्या अष्टकाचा एक नमुना पाहा:-
‘नमो धर्मवीरा नमो देशिकेंद्रा। झडो त्वकृपे आमुची मोहनिद्रा।
जडो नित्य चित्ती तुझी ध्यानमुद्रा। घडो सत्कृती, मार्ग दावी दयाद्र्रा।।१।।
बुडालो अम्ही खोल पापार्णवात। प्रपंचाचिया घातकी कर्दमात।
अम्हा तारण्या स्वामि तूची समर्थ। तयाकारणे प्रार्थितो तूज नित्य।।२।।'
असे हे वीरशैव मराठी वाङ्मयाचे समृद्ध दालन आहे. या वाङ्मयावर पंधरा शोधप्रबंध लिहिले गेले आणि प्रबंधलेखकांना पीएच०डी० पदव्याही मिळाल्या. परंतु अजूनही या हिमनगाचा पूर्ण अभ्यास झालेला नाही. वाङ्मय उपलब्ध आहे, परंतु अप्रकाशित आहे. या वाङ्मयाच्या साक्षेपी अभ्यासानंतरच महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि मराठी वाङ्मयात वीरशैव मराठी वाङ्मयाचे कोणते आणि किती योगदान आहे हे समजू शकेल.
---------------------------------------------------------------------------
जालना येथील जे० ई० एस० महाविद्यालयात,
महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
राष्ट्रीय चर्चासत्रात वाचलेला शोधनिबंध
१२ फेब्रुवारी २००५

No comments:

Post a Comment