लिंगधारणस्थल
-१-स्फटिक, पाषाण, मणी चंद्रकांत। बाण, सूर्यकांत याच्यातून।।१।।
घडवावे लिंग देखणे सुबक। शास्त्रयुक्त एक लक्षणांनी।।२।।
पंचगव्य-पंचामृताने करावे। शुद्ध नि पूजावे बेलपुष्पे।।३।।
पंचाक्षरी मंत्रे संस्कार करावे। शिष्यकरी द्यावे श्रीगुरूने।।४।।
शिष्यमस्तकीच्या शिवकलांप्रत। लिंगाठायी स्थित करूनिया।।५।।
शिवकलापूर्ण लिंगास प्राणात। शिष्याच्या स्थापित करावे हो।।६।।
शिव-जीवकलासामरस्ययुक्त। शिष्याच्या करात लिंग द्यावे।।७।।
शेष म्हणे असे लिंग विधिपूर्ण। करावे धारण निष्ठायुक्त।।८।।
-२-
‘शिष्या, लिंग तुझे प्राणलिंग जाण। करावे धारण प्राणासम।।१।।
शरीरावर ते सदैव असावे। वियुक्त नसावे किंचित्काल।।२।।
अनवधानाने पडे भूमीवर। तत्काल तू कर प्राणत्याग।।३।।
तुला मोक्ष प्राप्त तेधवा होईल। पण अशी वेळ येऊ नये।।४।।
जसे प्राणाला रे जपतो माणूस। तसेच लिंगास जपावे बा‘।।५।।
शेष म्हणे असा गुरू उपदेश। करिती शिष्यास स्पष्टपणे।।६।।
-३-
शिवयोगियाने मूलाधारस्थानी। लिंग सुवर्णवर्णी कल्पावे हो।।१।।
पोवळ्यासारखे हृदयी कल्पावे। भ्रूमध्यात ध्यावे शुभ्रवर्ण।।२।।
अशी अंतरंगी लिंगाची धारणा। त्यास नाव जाणा निरुपाधिक।।३।।
बाह्यलिंगापेक्षा कोटीपट श्रेष्ठ। म्हणती वरिष्ठ शिवयोगी।।४।।
अंतरी करिती लिंग जे धारण। त्यास पुन्हा जन्म नाही नाही।।५।।
शेष म्हणे लिंगधारण पवित्र। करिता त्रिनेत्र संतोषतो।।६।।
-४-
मस्तकी, कंठात, कक्ष-वक्षावर। किंवा पोटावर, तळहाती।।१।।
ईश्वरस्वरूपी लिंगाचे धारण। भक्ते आमरण करावे हो।।२।।
नाभीस्थानी, जटेवर, पाठीवर। मूलस्थानावर लिंग नको।।३।।
करपीठी लिंग ठेवूनि पूजितो। परिशुद्धच तो शेष म्हणे।।४।।
-५-
नाही तपश्चर्या, पक्व नाही मन। वैराग्य रुसून गेलेले ते।।१।।
शिवसंस्काराचा मुळी लेश नाही। विवेकही नाही नित्यानित्य।।२।।
ज्यास नाही गुरुकारुण्यही प्राप्त। राहिला वंचित दीक्षेतून।।३।।
त्याने इष्टलिंग घेऊनि विकत। आपल्या गळ्यात घालू नये।।४।।
गुरुदीक्षेविण लिंगाचे धारण। पापाचे कारण शेष म्हणे।।५।।
-६-
लिंगधारणेचे व्रत हे महान। देहावर जाण देव आहे।।१।।
असे भान नित्य भक्ताने ठेवावे। सर्वस्व अर्पावे लिंगाठायी।।२।।
लिंगासाठी वेषभूषा, खाणे-पिणे। लिंगासाठी जिणे सर्वकाळ।।३।।
सुखदु:खभोग आणि हर्ष-खेद। लिंगाचा प्रसाद मानावा हो।।४।।
असा सर्वस्वाने लिंगरूप झाला। सफल जहाला जन्म त्याचा।।५।।
शेष म्हणे लिंग हाच जीवप्राण। वर्तावे मानून वीरशैवे।।६।।
- शे. दे. पसारकर, सोलापूर
No comments:
Post a Comment