Monday, 27 May 2013

शिवाचे कार्य

शिवाचे कार्य

         सर्वसाधारणपणे बर्‍याच जणांना एखाद्या देवतेचा नामजप कसा करायचा, तिला कोणती फुले वहायची, यांविषयी माहिती असते; परंतु त्या देवतेचे कार्य, तिची अन्य अध्यात्मशास्त्रीय वैशिष्ट्ये आदींविषयी सखोल माहिती नसते. त्या दृष्टीने या लेखात शिव या देवतेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.


१. विश्‍वाची उत्पत्ती

         शिव-पार्वतीला ‘जगतः पितरौ’, म्हणजे जगाचे आई-वडील म्हटले जाते. विश्‍वाच्या संहाराच्या वेळीच नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण शिव निर्माण करतो.

१ अ. शिवाच्या डमरूतील नादातून विश्‍वाची उत्पत्ती होणे

 
शंकराच्या डमरूतील ५२ स्वरांतून, म्हणजे ५२ नादांतून नादबीजे म्हणजे बीजमंत्र (५२ अक्षरे)  निर्माण झाले आणि त्यांतून विश्‍वाची उत्पत्ती झाली. नद् - नाद् म्हणजे सातत्याने वहात रहाण्याची प्रक्रिया. या नादबिजांतून ‘द द दम्’ म्हणजे ‘ददामि त्वम् । (मी तुला देत आहे)’ असा नाद आला. शिवाने विश्‍वाला ‘मी ज्ञान, पावित्र्य आणि तप देत आहे’ अशी जणू निश्‍चिती दिली.

१ आ. शिवाच्या तांडव नृत्यातून विश्‍वव्यापार चालू होणे

         शिवाचे ‘नटराज’ असेही एक नाव आहे. शिवाचे तांडव नृत्य जेव्हा चालू होते, तेव्हा त्या नृत्याच्या झंकाराने सर्व विश्‍वव्यापाराला गती मिळते आणि जेव्हा त्याचे नृत्य विराम पावते, तेव्हा हे चराचर विश्‍व आपल्यात सामावून घेऊन तो एकटाच आत्मानंदात निमग्न होऊन रहातो.

१ इ. सर्वत्र व्यापून राहिलेल्या चैतन्यमय शिवत्वाचे स्फुरण म्हणजेच विश्‍व

         ‘प्रत्येक जिवात शिवत्व (आत्मतत्त्व) असून ते चैतन्यरूप आहे. तोच परम शिव. हा परम शिव प्रत्येक वस्तूला व्यापून आहे. हे त्याचे विश्‍वात्मक रूप. सर्व वस्तूंना व्यापूनही तो शिल्लक आहेच. हे त्याचे `विश्‍वोत्तीर्ण’ रूप. विश्‍व हे त्याचेच स्फुरण आहे. विश्‍व हे पूर्वी अस्तित्वात होतेच. सृष्टीकाळात शिवशक्‍तीच्या योगाने ते प्रगट झाले.’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१ ई. परम शिवाच्या स्वातंत्र्यशक्‍तीमुळे प्रतिबिंबाविनाच जगाचे प्रतिबिंब असणे

         ‘परम शिव हे एकमेव तत्त्व आहे. `माया’ हे त्याने स्वेच्छेने घेतलेले रूप आहे. परम शिव हाच सृष्टी, स्थिती, संहार, अनुग्रह आणि विलय या पाच कर्मांचा संपादक आहे. जगत हे परम शिवाचे प्रतिबिंब आहे. वृक्ष, पर्वत, हत्ती, गाय आदी निर्मल आरशात प्रतिबिंबित होतात. ते आरशापेक्षा भिन्न दिसतात. वास्तविक ते प्रतिबिंबापेक्षा अभिन्न आहेत. तसेच परम शिवात प्रतिबिंबित झालेले विश्‍व अभिन्न असूनही हत्ती, गाय, पर्वत, वृक्ष असे भिन्न भासते. बिंब असेल, तरच प्रतिबिंब असते; पण इथे परम शिवाच्या स्वातंत्र्यशक्‍तीमुळे प्रतिबिंबाविनाच जगाचे प्रतिबिंब असते.’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


२. जगद्‍गुरु

         ‘ज्ञानं महेश्‍वरात् इच्छेत् मोक्षम् इच्छेत् जनार्दनात् ।’, म्हणजे शिवापासून ज्ञानाची आणि जनार्दनापासून (श्रीविष्णूपासून) मोक्षाची इच्छा करावी.


३. स्वतः साधना करून सर्वांची उत्तरोत्तर प्रगती करून घेणारा

         ‘शिव उत्तर दिशेला असलेल्या कैलास पर्वतावर ध्यान करतो आणि सर्व जगावर लक्ष ठेवतो. तो स्वतः साधना करून सर्वांची उत्तरोत्तर प्रगती करून घेतो.’ - प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


४. कामदेवाचे दहन करणारा, अर्थात चित्तातील कामादी दोष नष्ट करणारा

         एखाद्या चार-पाच वर्षांच्या मुलाने मोठ्या माणसाशी लढण्याचा प्रयत्न करण्याहून वासनांशी लढणे पुष्कळ कठीण आहे. कामदेवाला शिवानेच जाळले. यावरून शिवाचे सामर्थ्य आणि अधिकार लक्षात येतो.

४ अ. शिवाने कामदेवाला जाळल्यावर त्याला सर्वांच्या मनात स्थान देणे

         ‘भ्रूमध्याजवळचा तिसरा नेत्र उघडून शंकराने कामवासना तर नष्ट केलीच, त्यासह कामदेवालाही जाळले. जगातूनच कामवासना नष्ट केली. `आता प्रजानिर्मिती कशी होणार', यासाठी कामदेवाची पत्नी रती हिने केलेल्या प्रार्थनेवरून शिवाने कामदेवाला जीवन दिले; पण तो अनंग (शरीर नसलेला) झाला, मनोज झाला. तो सर्व देहधारी जिवांच्या चित्तात ठाण मांडून सर्व जग जिंकतो आहे. यासाठी वासना नष्ट होण्याकरिता शंकराची आराधना करा. त्याच्या कृपेने चित्त कामादी दोषांरहित होईल.’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


५. आज्ञाचक्राचा अधिपती

         आपल्या शरिरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार ही सात चक्रे आहेत. कुंडलिनीशक्‍तीचा प्रवास या चक्रांतूनच होतो. चक्रे विविध देवतांशी संबंधित आहेत, उदा. मूलाधारचक्र श्री गणपतीशीआणि स्वाधिष्ठानचक्र दत्ताशी संबंधित आहे. थोडक्यात ती ती देवता त्या त्या चक्राची अधिपती आहे. शिव आज्ञाचक्राचा अधिपती आहे. शिव आदिगुरु आहे. गुरुसेवेत असलेल्या शिष्याचा ‘आज्ञापालन’ हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. अशा दृष्टीने आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेले शिवाचे स्थान हे एकप्रकारे शिवाच्या गुरुत्वाचीच साक्ष देते. शिवाचा तृतीय नेत्र (ज्ञानचक्षू) असण्याचे स्थानही तेच आहे.


६. मृत्युंजय

         ‘महादेवाला ‘सोमदेव’ असेही म्हणतात. दक्षिण दिशेचा स्वामी यम. ही मृत्यूची देवता आहे, तर सोम (शिव) हा मृत्युंजय असा उत्तर दिशेचा स्वामी आहे. शंकराची पिंडीही नेहमी उत्तरेलाच ठेवतात. यम स्मशानातला स्वामी, तर स्मशानात राहून रुंडमाला धारण करणारा आणि ध्यानधारणा करणारा देव म्हणजे शिव. जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन ईश्‍वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.’ - प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


७. त्रिगुणातीत करणारा

         सत्त्व, रज आणि तम या तिघांना, म्हणजेच अज्ञानाला, शंकर एकत्रितपणे नष्ट करतो.


८. काळानुसार कार्य

काळ

नाव

आविष्कार / कार्य

१. वेदकाळ
रुद्र (रडवणारा)
उग्र
२. वेदोत्तरकाळ
शिव
सौम्य
३. पुराणकाळ
महेश
ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तीतील संहारक देवता
४. पुराणोत्तरकाळ
महादेव (देवाधिदेव)
उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींचा कर्ता

No comments:

Post a Comment