शैव दर्शन आणि एक गुराखी
प्राचीन काळापासून हिमालय योग्यांचे वसतीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात कैलास म्हणजे तर साक्षात श्रीशंकराचे निवासस्थान मानले गेले आहे. याच कैलास पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळलेला एक योगी सुंदरार किंवा सुंदरनाथ. अतिशय उच्च कोटीचा शैव सिद्ध. एकदा त्याला आपला मित्र अगस्त्यार (अगस्ती ऋषी) याला भेटण्याची इच्छा झाली. अगस्त्यारचे वास्तव्य दक्षिणेकडे होते तेव्हा सुंदरनाथ कैलासावरून दक्षिणेला जायला निघाला. मजल दरमजल करत तो थिरूकडईक्कप्पू (Tirukadaikkappu) या तामिळनाडूमधील गावी पोहोचला.गावाच्या वेशीवर त्याला एक गाईंचा कळप हंबरत सैरभैर अवस्थेत भटकलेला दिसला. नीट पाहिल्यावर त्याला असे आढळले की त्यांचा गुराखी मृतावस्थेत पडला आहे. सुंदरनाथला फार वाईट वाटले. त्या सैरभैर झालेल्या गाईंची त्याला दया आली. त्यांना त्याच अवस्थेत सोडून पुढे जाणे त्याला योग्य वाटले नाही. सुंदरनाथ स्वतः एक सिद्ध होता. अष्टमहासिद्धी त्याचा चरणांशी लोळत असत. त्याने आपल्या योगासामर्थ्याने आपल्या देहाचा त्याग केला आणि त्या मेलेल्या गुराख्याच्या शरीरात प्रवेश केला. भटकलेल्या गाईंना त्यांच्या गोठ्यापर्यंत सोडावे आणि परत आपल्या जुन्या देहात प्रवेश करावे असे त्याने ठरवले. आपला जुना देह आडोशाला दडवून ठेवून तो गाईंना गावात पोहोचवण्यासाठी निघाला.
गुराख्याच्या शरीरातील सुंदरनाथने गाईंची व्यवस्था नीट लावली आणि तो परत मूळ ठिकाणी आला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला आपला जुना देह कोठेच दिसेना. आदिनाथ शंकरानेच शैव दर्शनाचा पुनर्प्रसार दक्षिणेकडे व्हावा हा हेतू मनात धरून तो नाहीसा केला होता. आपला जुना देह नाहीसा झाल्याने सुंदरनाला गुराख्याच्या देहातच रहाणे भाग पडले. जवळच असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली तो समाधीस्त बसू लागला. हळूहळू गावात ही गोष्ट समजली. लोक त्याला पाहायला गर्दी करू लागले. त्याचे नाव माहीत नसल्याने गावाच्या नावावरून त्याला थिरुमुलार म्हटले जावू लागले. सुंदरनाथचा थिरुमुलार झाला. जवळजवळ सर्व काळ तो समाधीतच असे. जेव्हा कधी भानावर येई त्तेव्हा त्याच्या तोंडून एखादा श्लोक बाहेर पडे आणि मग तो परत समाधीत जाई. त्याच्या जवळपासचे लोक त्याचे बोल उपदेश म्हणून जतन करत असत. करता करता अशा ३००० तामिळ श्लोकांचा समूह तयार झाला. तो उपदेश समूह आजही दक्षिणेकडे विशेषतः तामिळनाडूमध्ये 'थिरुमंदिरम' म्हणून प्रसिद्ध आहे.
थिरुमंदिरम हा शैवदर्शन आणि कुंडलिनी योग या विषयावरील एक अतिशय अधिकारी आणि प्रामाणिक असा ग्रंथ आहे. नऊ प्रकरणांमध्ये त्याची विभागणी केलेली आढळते.
थिरुमंदिरमची काही वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे:
- संस्कृतेतर भाषेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांतील एक अतिशय उच्च कोटीचा ग्रंथ.
- आज मुळ शैव आगम ग्रंथ मिळणे दुरापास्त झाले आहे. थिरुमंदिरम समस्त शैव आगमांचे सार आहे. स्वतः थिरुमुलारनेच त्याला 'आगम' असे म्हटले आहे.
- शिवभक्ती, यंत्र, मंत्र, कुंडलिनी योग, चर्या, ज्ञान इत्यादी अनेक विषयांवर तो प्रकाश टाकतो.
- थिरुमंदिरम सर्व विचारधारांना एकत्र आणणारा ग्रंथ आहे. वेद आणि आगम हे दोन्ही शंकरानेच दिले आहेत. त्यात अंतिम उद्दिष्टाच्या दृष्टीने काहीच फरक नाही. 'वेदान्त' आणि 'सिद्धान्त' एकच आहेत असे थिरुमुलार सांगतो.
- ईश्वर म्हणजे प्रेम (God is Love) ही थिरुमंदिरम मधील प्रसिद्ध उक्ती आहे.
- थिरुमंदिरममध्ये आपल्याला 'भेसळमुक्त' शैव दर्शन आणि कुंडलिनी योग पाहायला मिळतो.
सदा शिवचरणी लीन,
veershaiv dharm
No comments:
Post a Comment